पातूर, दि. २० मे २०२६ : पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत माळराजुरा वर्तुळातील गोंधळवाडी नियतक्षेत्राच्या वनहद्दीबाहेर मोरणा नदीपात्रात एका बिबट्याचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण केली.
वनविभागाला मोरणा नदीपात्रात वन्यप्राण्याचा मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पातूर व मालेगाव वनपरिक्षेत्राच्या सीमेवरील संबंधित ठिकाणी अकोला व वाशिम वनविभागाची पथके तसेच मानद वन्यजीव रक्षक दाखल झाले. प्राथमिक पाहणीत सदर मृतदेह बिबट्याचा असून तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, बिबट्याचे चारही पायांची नखे व दात घटनास्थळी सुरक्षित अवस्थेत आढळून आले.
पशुधन विकास अधिकारी आलेगाव डॉ. श्रुती चव्हाण तसेच पशुधन विकास अधिकारी बार्शीटाकळी डॉ. गोकुळ खंडेलवाल यांच्या पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळीच बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व पंचांच्या उपस्थितीत लाकूड व इंधनाच्या सहाय्याने मृतदेहाचे संपूर्ण दहन करून नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.
ही संपूर्ण कार्यवाही श्री. सुमंत सोळंके (उपवनसंरक्षक, अकोला) व श्री. अभिजित वायकोस (उपवनसंरक्षक, वाशिम) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कु. नम्रता टाले (सहाय्यक वनसंरक्षक, अकोला), श्री. सुशील मंतावर (सहाय्यक वनसंरक्षक, वाशिम), श्री. अमोल सावंत व श्री. मिलिंद शिरभाते (मानद वन्यजीव रक्षक, अकोला), श्री. आकाश अहाळे (मानद वन्यजीव रक्षक, वाशिम), श्री. एस. टी. काळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव), श्री. पवन जाधव (वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव), श्री. विशाल देशमुख (वनसर्व्हेक्षक, अकोला), श्री. जी. एस. इंगोले (वनसर्व्हेक्षक, वाशिम), वनपाल श्री. डी. ए. सकर्डे तसेच वनरक्षक शंकर सावळे, अविनाश घुगे, ओम सावके, के. डी. मुरकुटे, एस. एस. करवते उपस्थित होते.
तसेच पंच म्हणून श्री. वामन आनंदा भोकरे (पोलीस पाटील, गोंधळवाडी) व श्री. गजानन उत्तम पांडे यांनीही कार्यवाहीदरम्यान उपस्थिती दर्शविली.






