सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता
पातूर | प्रतिनिधी
पातूर नगरपरिषदेची बहुप्रतिक्षित निवडणूक येत्या 20 जून रोजी होऊ घातली असून निवडणुकीची राजकीय रणधुमाळी आता वेग घेताना दिसत आहे. दिनांक 18 मे पासून सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सदस्य पदासाठी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्ष व इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण जागेसाठी आनंद रामभाऊ तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच प्रभाग क्रमांक 2-ब सर्वसाधारण महिला जागेसाठी अलका सुरेंद्र उगले यांनी अर्ज सादर केला आहे.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील मोठी हालचाल पाहायला मिळाली. नामनिर्देशन प्रक्रियेत प्रभाग 3 मधून कैलास मोतीराम उगले, अजय गजानन पाटील आणि राजू लक्ष्मण उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रभाग 3-ब सर्वसाधारण महिला जागेसाठी पुनम सचिन सिंह बायस यांनी अर्ज भरला असून प्रभाग 3-व सर्वसाधारण महिला जागेसाठी निशा संजय निखाडे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 25 मे आहे. मात्र शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे प्रत्यक्षात सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. त्यामुळे सोमवारी नगरपरिषद कार्यालयात इच्छुक उमेदवार, पक्ष पदाधिकारी व समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पातूर शहरात विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती, आघाड्या, बंडखोरी आणि प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू झाली असून आगामी काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.






