पातूर | प्रतिनिधी
शिरला ग्रामपंचायत हद्दीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सन २०२३ आणि २०२४ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक, सचिव व सरपंच यांच्या कार्यकाळात १५ वा वित्त आयोग, सामान्य निधी, दलित वस्ती सुधार योजना आणि वृक्षलागवड योजनेअंतर्गत तब्बल दीड कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेष म्हणजे या खर्चाचा ऑनलाईन रेकॉर्ड किंवा अधिकृत नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. “कामे झाली कुठे आणि पैसा गेला कुठे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.शिरला ग्रामपंचायत अंतर्गत शिरला गावासह पातूर बागायत, पातूर पट्टी आणि अमराई ही महसुली गावे येतात. मात्र मूळ शिरला गाव वगळता उर्वरित तीन गावांमध्ये सार्वजनिक विद्युत व्यवस्थाच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीने सार्वजनिक लाईट दुरुस्ती व देखभालीसाठी तब्बल १ लाख १२ हजार रुपये खर्च दाखविल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.गावात अवघे ४० ते ५० सार्वजनिक विद्युत खांब असताना एवढा खर्च नेमका कशावर करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली १ लाख ७६ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.मात्र प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम किंवा महिला सक्षमीकरण उपक्रम झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून निधीची अफरातफर केल्याची चर्चा गावात रंगली आहे.दरम्यान,ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. “भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करणार का,की हा भ्रष्टाचार फाईलपुरताच मर्यादित राहणार,याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






