पातूर प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील बहुचर्चित पातूर नगरपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून येत्या जून महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाने पातूर शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय मैदानात दमदार एन्ट्री केली आहे. या घडामोडीमुळे शहरातील अनेक राजकीय पक्षांचे गणित पूर्णपणे बिघडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख Rajan Salvi यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे पातूर तालुक्यात शिवसेनेला मोठे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी पंचायत समिती सभापती तथा युवकांचे प्रेरणास्थान अनंत उर्फ बालू बागडे, सुनील आवटे आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार सय्यद ऐसाअनुदिन यांच्या नेतृत्वात अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश करत राजकीय वातावरण तापवले आहे.
यामध्ये शिक्षण क्षेत्रातील व उद्योजक शंकरराव बोचरे, छत्रपती गाडगे, किरणकुमार निमकंडे, प्रगतिशील शेतकरी अरुण पाटील, उबाठा गटाचे खंदे समर्थक अंबादास देवकर, संदीप फुलारी यांच्यासह शेकडो नागरिकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने पातूर शहरात शिंदे सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे पातूर नगरपरिषदेच्या सर्व 20 जागांवर शिवसेना शिंदे गट आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असून त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. शहरातील पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून अनेक पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेच्या या आक्रमक राजकीय एन्ट्रीमुळे पातूर शहरातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येत्या 20 जून रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात, यावर पातूरच्या राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.






