पातूर प्रतिनिधी :
अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत मोठ्या प्रमाणात सडवा मोहाचा माल व दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी गुप्त माहितीच्या आधारे चान्नी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली नवगाव शेतशिवारात छापा टाकण्यात आला. यावेळी विजय महादेव पांडे (वय 35 वर्षे) व जगदेव महादेव ससाणे (वय 55 वर्षे),दोघेही रा.नवगाव हे गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 585 लिटर सडवा मोहाचा माल,30 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 84 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक अवचित चांडक यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी.रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पदघन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत प्रभारी अधिकारी रविंद्र लांडे,पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख,पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सोळंके व रूपेश मोरे यांनी सहभाग घेतला.या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून,अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.






