अकोला, प्रतिनिधी : बाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ५ जून रोजी शिवसेना जिल्हा कार्यालयात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांनी आमदार देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सकाळपासूनच जिल्हा कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे परिसर गजबजून गेला होता. अनेकांनी पुष्पगुच्छ देत आमदार देशमुख यांना निरोगी आयुष्य व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे जिल्हा कार्यालय परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते.
आमदार नितीन देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत मतदारसंघातील विकासकामे, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि सातत्याने केलेला जनसंपर्क यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे चित्र वाढदिवसानिमित्त झालेल्या गर्दीतून दिसून आले. बाळापूर मतदारसंघातील विविध गावांमधून तसेच शहरांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील विश्वास आणि प्रेम व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक व उमेदवारांनी आमदार देशमुख यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार देशमुख यांनी मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण अधिक जोमाने काम करत राहू, अशी ग्वाही दिली.
आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उसळलेली शिवसैनिकांची गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, बाळापूर मतदारसंघात त्यांचे वाढते राजकीय वर्चस्व आणि जनाधार पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शक्तिप्रदर्शनाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.






