पातूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अकोला’ परिवाराच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा ध्यास घेत संस्थेच्या आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या काळात वाढते प्रदूषण आणि हवामान बदल पाहता पर्यावरणाचे रक्षण करणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. या सामाजिक बांधिलकीची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून ‘सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अकोला’ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबवला. याअंतर्गत संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. या माध्यमातून संस्थेने एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक संदेश समाजाला दिला आहे.
या भव्य वृक्षारोपण मोहिमेला सेंट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अकोलाच्या सर्व घटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी संस्थेचे डायरेक्टर विद्याशंकर, सिनियर फॅकल्टी श्वेता गेदम, सिनियर असिस्टंट पूनम देशमुख, फॅकल्टी रश्मी घाटोळ,फॅकल्टी शुभम सेलूकर,डी एस ट्रेनर दिपाली ससाने,बबिता चव्हाण,व ज्वेलरी मेकिंग व ब्यूटी पार्लरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.






