पातूर प्रतिनिधी : पातूर शहरात घरगुती गॅस ग्राहकाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडियन गॅस कंपनीचा सिलेंडर घेतल्यानंतर काही वेळातच गॅस संपल्याचे लक्षात आल्याने ग्राहकाने सिलेंडरची तपासणी केली असता त्यामध्ये गॅसच्या ऐवजी पाणी भरलेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पातूर येथील एका ग्राहकाने नियमितप्रमाणे घरगुती वापरासाठी इंडियन गॅसचा सिलेंडर घेतला होता. सिलेंडर जोडून वापर सुरू केल्यानंतर अत्यल्प वेळात गॅस संपल्यासारखी स्थिती निर्माण झाली.त्यामुळे संशय आल्याने ग्राहकाने सिलेंडरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर संबंधित ग्राहकाने गॅस वितरकाकडे तक्रार नोंदवून घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झाल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान,या प्रकरणात नेमके पाणी कसे आले,ते भरण्याची चूक कुठे झाली किंवा सिलेंडरमध्ये छेडछाड झाली का,याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.मात्र,संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






