पातुर, प्रतिनिधी : पातुर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून प्रचारासाठी उमेदवारांकडून विविध आधुनिक आणि आकर्षक माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये काही उमेदवारांनी मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हवेत उडणारे भलेमोठे फुगे (एअर बलून) आपल्या प्रभागात लावले आहेत. या फुग्यांवर संबंधित उमेदवारांची निवडणूक निशाणी, संदेश व प्रचार साहित्य आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले आहे.
या अभिनव प्रचार तंत्रामुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात असले तरी काही प्रभागांमध्ये लावण्यात आलेल्या फुग्यांमधील हवा कमी झाल्याने किंवा फुगे खाली आल्याने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. विरोधी गटांकडून “फुग्यातली हवा गेली” असा टोला लगावत संबंधित उमेदवारांच्या प्रचारावर निशाणा साधला जात आहे.
सोशल मीडियावरही या फुग्यांची चर्चा रंगली असून “गेली हवा आतापासून”! यावर चर्चा होत आहे तर काही ठिकाणी फुग्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत. समर्थकांकडून हा प्रचाराचा नवा आणि प्रभावी प्रयोग असल्याचे सांगितले जात असताना विरोधक मात्र यावरून राजकीय चिमटे काढत असून प्रतिस्पर्ध्याची हवा काढण्याचा प्रयत्न होत आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात आता पारंपरिक बॅनर, पोस्टर आणि सभा यांच्यासोबत आधुनिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण कल्पनांचाही वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पातुरच्या निवडणूक रणधुमाळीत ‘फुग्यांचा प्रचार’ हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.






