पातूर प्रतिनिधी : पातूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागून काही दिवस उलटले असले, शहरातील दोन प्रभाग मधील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे. एका ज्येष्ठ नेत्याने निवडणुकीदरम्यान एका समर्थकाला पराभूत करण्यासाठी पैशांचा वापर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, “७५ हजार रुपये कोणी घेतले?” हा प्रश्न सध्या गावातील विहिरीच्या काठापासून चौकाचौकात चर्चेचा विषय बनला आहे.हा नेता कधी कोणाला विकून टाकील याचा नेम नाही.
या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पराभूत उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात असताना, विजयी उमेदवार मात्र या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू असून, काही जण या चर्चेला केवळ अफवा मानत आहेत, तर काही जण यामागील सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, या कथित व्यवहाराबाबत कोणताही अधिकृत पुरावा किंवा संबंधितांकडून अधिकृत दुजोरा समोर आलेला नाही.
दरम्यान, राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा चर्चांमुळे निवडणुकीनंतरचे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघत असून, सत्य काय आहे हे समोर आल्याशिवाय या चर्चांना पूर्णविराम मिळणे कठीण आहे.







