पातूर प्रतिनिधी : देशातील प्रख्यात शेतकरी नेते राकेश टिकैत हे गुरुवार, दि.6 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पातूर शहरातील महात्मा जोतिराव फुले स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची तयारी करत आहेत.दौऱ्यादरम्यान महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यांच्या शेतकरी, कष्टकरी आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.त्यानंतर शेतकरी बांधवांशी संवाद साधून सध्या शेती क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे.शेतीमालाला हमीभाव,वाढते उत्पादन खर्च, पीकविमा,नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान,सिंचन, वीजपुरवठा,कर्जमाफी,शेतकरी सन्मान आणि कृषी धोरणांबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावेत,यासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आयोजकांच्या माहितीनुसार,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता शासनाला प्रभावीपणे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकरी एकजूट निर्माण करून विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश या दौऱ्यातून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पातूर व परिसरातील शेतकरी,युवक,सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध शेतकरी संघटनांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आयोजकांनी सर्व शेतकरी बांधव,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे,तसेच आपल्या सहभागातून ही चळवळ अधिक प्रभावी बनवावी,असे आवाहन केले आहे.







