अकोला, दि. ७ ऑगस्ट : अकोला जिल्ह्यातील बोगस बियाणे प्रकरणांचा सखोल, निष्पक्ष व प्रभावी तपास करण्यासाठी अकोला जिल्हा पोलिसांनी विशेष तपास पथक (Special Investigation Team – SIT) स्थापन केले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार या पथकाची स्थापना करण्यात आली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या SIT चे प्रमुख अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी असतील. पथकात सहाय्यक पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एमआयडीसी, कोतवाली, रामदासपेठ, तेल्हारा, अकोट शहर, मूर्तिजापूर शहर, बार्शीटाकळी, बाळापूर आणि पातूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जुलै २०२६ मध्ये बोगस बियाणे अधिनियम व जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत.
हे गुन्हे मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असून शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असल्याने संपूर्ण साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.







