पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरात गावठी दारू,मटका-जुगार आणि इतर अवैध व्यवसायांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गावठी दारूमध्ये आरोग्यास घातक अथवा विषारी द्रव वापरला जात असल्याच्या आरोपांचीही चर्चा असल्याने प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.विशेष म्हणजे,अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवरच आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.अधूनमधून कारवाई होते,काही व्यक्तींवर गुन्हे दाखल होतात.मात्र त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात अवैध व्यवसाय सुरू होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.त्यामुळे ही कारवाई कायमस्वरूपी नियंत्रणासाठी आहे की केवळ कागदी आकडेवारी वाढविण्यासाठी?असा सवाल उपस्थित होत आहे.कारवाई होते,मग धंदे पुन्हा सुरू कसे होतात?अवैध दारूधंद्यांवर कारवाई करूनही काही दिवसांत पुन्हा व्यवसाय सुरू होत असेल,तर स्थानिक गुन्हे शाखेची माहिती यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे ? अवैध धंदे चालविणाऱ्यांची संपूर्ण साखळी पोलिसांच्या रडारवर आहे का ? कारवाईनंतर त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जाते का ? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
विषारी द्रवाच्या आरोपाची स्वतंत्र तपासणी होणार का?
गावठी दारूमध्ये विषारी अथवा आरोग्यास घातक द्रव वापरल्याच्या चर्चेने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दारूचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे का ? संबंधित ठिकाणांहून नमुने जप्त करून त्यांची रासायनिक तपासणी का करण्यात येऊ नये ? या प्रश्नाचे उत्तर पोलिस प्रशासनाने देणे आवश्यक आहे.स्थानिक गुन्हे शाखेला आव्हान—‘अवैध धंदे थांबवून दाखवा !’ आलेगाव परिसरात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी खऱ्या असतील तर स्थानिक गुन्हे शाखेने केवळ छापेमारीपुरती कारवाई न करता या धंद्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.पैसा कुठून येतो,माल कुठून येतो, विक्रीचे जाळे किती मोठे आहे आणि या व्यवसायामागे आणखी कोण आहेत,याचा तपास झाला पाहिजे.अवैध धंदे सुरूच राहणार असतील तर पोलिसांच्या कारवाईचा नेमका परिणाम काय ? आलेगाव अवैध दारूधंद्यांचे ‘हब’ बनत असेल तर स्थानिक गुन्हे शाखा नेमकी काय करत आहे ? कारवाईनंतरही धंदे पुन्हा सुरू होत असतील तर त्याला जबाबदार कोण ? या प्रश्नांची उत्तरे आता स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावीत,अशी मागणी जोर धरत आहे.







