पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांडागाव येथे महापुरुषाच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे.महापुरुषाच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याचे समोर येताच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.घटनेचा निषेध नोंदवत सुमारे ३०० संतप्त ग्रामस्थांनी चान्नी पोलीस ठाण्यात धडक देत ठिय्या आंदोलन केले

.संबंधित आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान,पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग देत संशयावरून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शताब्यात घेतलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समजते.या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान,महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

करण्यासाठी गोर सेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावातील वातावरण अधिक संवेदनशील झाले असून पोलिस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.महापुरुषांच्या स्मारकांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी,तसेच या घटनेमागील नेमका सूत्रधार कोण आहे, याचा छडा लावावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.घटनेमुळे गावांडागावसह परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस तपासाच्या निष्कर्षाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







