*परिसरात युवक-युवतींच्या अशोभनीय वर्तनामुळे नागरिक त्रस्त*
पातुर प्रतिनिधी :- पातूर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर गोंधळवाडी ग्रामीण भागात असलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला दोधानी धबधबा सध्या पावसाळ्यात पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनला आहे. मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबीयांसह व मुलांसोबत येथे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.

मात्र,पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस व्यवस्था दिसून येत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. धबधब्याच्या परिसरात ना सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ना कोणत्याही प्रकारचे शासकीय दिशानिर्देश अथवा सावधानतेच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुटुंबीयांसह फिरण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,परिसरात काही युवक-युवतींकडून अशोभनीय व आक्षेपार्ह प्रकार केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे इतर पर्यटक,विशेषतः महिला व लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना अस्वस्थ परिस्थितीचा सामना करावा लागतो.रविवारी युवक-युवतींची गर्दी तुलनेने अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


हा परिसर एकांतात असून चारही बाजूंनी जंगलाने वेढलेला असल्याने भविष्यात कोणतीही अप्रिय अथवा गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. उल्लेखनीय म्हणजे,यापूर्वीही दोधानी धबधब्यात अनेक युवकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.असे असतानाही सुरक्षेच्या व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये नाराजी आहे.प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन धबधबा परिसरात सुरक्षा उपाययोजना कराव्यात, पोलिसांचा बंदोबस्त असावा, सावधानतेचे व आवश्यक सूचना देणारे फलक लावावेत तसेच नियमित देखरेखीची व्यवस्था करावी,अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून करण्यात येत आहे.







