पातूर (प्रतिनिधी) – पातूर शहरासह ग्रामीण भागात गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून गॅस सिलेंडरच्या कृत्रिम तुटवड्याच्या नावाखाली काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. यामुळे सामान्य नागरिकांना पहाटे ४ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत उन्हात रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस एजन्सीवर नंबर आल्यानंतर “केवायसी नाही”, “ओटीपी आल्यावर या” अशा कारणांवरून ग्राहकांना परत पाठवले जात होते. मात्र प्रत्यक्षात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत होत्या.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पातूरचे तहसीलदार डॉ. वानखडे तसेच पुरवठा निरीक्षक मॅडम यांनी संबंधित गॅस एजन्सीवर भेट देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. त्यांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

यावेळी तहसीलदारांनी शासनाच्या नव्या आदेशाची माहिती देत स्पष्ट केले की, कोणत्याही गॅसधारकाने रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहकांनी मोबाईलवरून गॅस बुकिंग करून ओटीपी प्राप्त झाल्यानंतर त्यांना घरपोच सिलेंडर मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच गॅस एजन्सी चालकांना कडक शब्दांत इशारा देत, “एजन्सीसमोर रांगा दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” अशी तंबीही तहसीलदारांनी दिली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, तहसीलदार डॉ. वानखडे व पुरवठा निरीक्षक मॅडम यांच्या कार्याचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे.







