पातूर (प्रतिनिधी) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य जयंती निमित्त पातूर शहरात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला पातूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
सकाळपासूनच पातूर शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणुकीत आकर्षण ठरलेल्या वेशभूषांमध्ये संतोषभाऊ इंगळे यांनी महात्मा फुले यांची, जय सुहास देवकर यांनी डॉ. आंबेडकर यांची, तर कीचवल प्रविण इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. यासोबतच बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत मिरवणुकीची शोभा वाढवली.
मिरवणुकीचा मार्ग गावातील मुख्य रस्त्यांवर रांगोळी व फुलांनी सजवण्यात आला होता. या शोभायात्रेद्वारे महान समाजसुधारकांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा व समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शोभायात्रेच्या समारोपावेळी चि. वेदांत संदीप देशमुख या चिमुकल्याने महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रभावी भाषण सादर केले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
या गुरु-शिष्य जयंती सोहळ्याचे आयोजन ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले उत्सव समता पातूर’ यांच्या वतीने करण्यात आले होते.







