पातूर (प्रतिनिधी):
पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथे होणारा बालविवाह पातूर पोलिस व अकोला बाल कल्याण समितीच्या संयुक्त पथकाने वेळेवर धाड टाकून थांबविला.या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अडचणीत येण्यापासून वाचले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,१६ एप्रिल रोजी बाभुळगाव येथे बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती पातूर पोलीस व बाल कल्याण समितीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पातूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष,तसेच बाल कल्याण समिती,अकोला यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.पथकाने प्रथम संबंधित मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विवाह सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन तात्काळ विवाह थांबविण्यात आला.पुढे बालिका व तिच्या पालकांशी संवाद साधून त्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम,२००६ अंतर्गत कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तसेच पातूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड,पोलीस शिपाई शंकर बोरकर,साई नवले आणि बाल कल्याण समिती,अकोला येथील सदस्य प्रांजली जयस्वाल,सुनील लाडुरकर,सुनील सरकटे यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.या घटनेमुळे बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासन सजग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.






