पातूर (प्रतिनिधी): कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात राज्यभरातील विक्रेत्यांनी दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विक्रेत्यांच्या मते, सध्या लागू असलेल्या काही नियमांमुळे किरकोळ विक्रेत्यांवर अन्याय होत असून “लिंकिंग” सारख्या सक्तीमुळे व्यापारावर मर्यादा येत आहेत. खते कंपन्यांकडून व्यापाऱ्यांवर आणि पर्यायाने शेतकऱ्यांवर टाकला जाणारा दबाव हा मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच गुणवत्तेच्या प्रश्नावरही विक्रेत्यांनी प्रशासनाला सवाल उपस्थित केला आहे. शासनमान्य उत्पादनांमध्ये दोष आढळल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी किरकोळ विक्रेत्यांनाच जबाबदार धरले जाते, अशी तक्रार त्यांनी केली. निकृष्ट बियाणे किंवा औषधांमुळे नुकसान झाल्यास प्रामाणिक विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विक्रेत्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर टीका करताना, “कृषी निविष्ठा विक्रीत आमचा कोणताही दोष नसताना आम्हालाच का लक्ष्य केले जाते?” असा सवाल उपस्थित केला आहे. या जाचक अटी आणि अन्यायकारक कारवाईविरोधात हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विक्रेत्यांनी शेतकरी बांधवांना या आंदोलनामागील भूमिका समजून घेण्याचे आवाहन केले आहे. हा लढा पारदर्शक आणि न्याय्य व्यवस्थेसाठी असल्याचे सांगत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या बंदमुळे कृषी क्षेत्रावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.






