पातूर (प्रतिनिधी):
गोमाता सन्मान आवाहन अभियान अंतर्गत पातूर येथे आज भव्य व यशस्वी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा एक भाग म्हणून पातूर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने गोभक्तांनी एकत्र येत निवेदन सादर केले.
गोवंश रक्षण, संवर्धन तसेच गोहत्येला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत, या मागणीसाठी समाजातील विविध घटक एकवटले होते. रॅलीमध्ये महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, गोशाळा संचालक तसेच सकल हिंदू समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आपली गोमातेप्रती भावना व्यक्त केली.

संत-महंतांनी कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. रॅलीदरम्यान “गोमाता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. समाजात गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी मत व्यक्त करताना सांगितले की, गोमाता ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तिचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. तसेच गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

जोपर्यंत सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला जात नाही आणि गोहत्येविरोधात कठोर कायदे होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार यावेळी सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
रॅलीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी पातूर येथील गोभक्त समाज, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पुढील काळातही हे अभियान अधिक तीव्र करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.






