पातूर (प्रतिनिधी):
पातूर तालुक्यातील मौजे मळसुर येथे रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट झाल्याने भीषण आग लागून महिला शेतकरी सौ. पूनम विनोद राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत लिंबू, आंबा, पेरू आदी फळझाडांसह ठिबक सिंचन व्यवस्था, स्प्रिंकलर पाईप आणि सोलर साहित्य जळून खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अचानक मुख्य लाईनवर शॉर्टसर्किट होऊन आगीचे गोळे जमिनीवर पडले. त्या वेळी शेतात गहू पिकाचे काड असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. वाऱ्यामुळे आग चारही बाजूंनी पसरली आणि विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
या आगीत सर्वे नंबर 71 मधील सौ. पूनम राऊत यांच्या शेतातील लिंबू, आंबा, पेरू झाडे तसेच सुमारे 5 एकर क्षेत्रातील झाडाखाली साठवून ठेवलेले ठिबक व स्प्रिंकलर साहित्य पूर्णपणे जळून गेले. तसेच तेजस सुभाष राऊत यांच्या शेतातील सोलर पॅनल, केबल, पाईप आणि फळझाडांचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी विनोद राऊत यांनी चानी पोलीस स्टेशन तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवून तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया :
“दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून ठिबक, स्प्रिंकलर संच, लिंबू, आंबा, पेरू झाडे जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मला तात्काळ भरपाई मिळावी,” अशी मागणी सौ. पूनम विनोद राऊत यांनी केली.
तर “वीज तार तुटून स्पार्किंग झाल्यामुळे माझे सोलर पॅनल, केबल, पाईप व आंबा-रामफळ झाडे जळाली. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी तेजस सुभाष राऊत यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीज विभागाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.






