📍 पातूर प्रतिनिधी
पातूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. नगरपरिषदेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
पातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विचारांचा मोठा प्रभाव असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत हा पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते Prakash Ambedkar यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे.
तालुका अध्यक्ष डॉ. ओम धर्माळ, महासचिव शरद सुरवाडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत विजय मिळवून तो वाढदिवसाची भेट म्हणून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
लवकरच वंचित बहुजन आघाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी आपली रणनीती आणि संभाव्य उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. आगामी काळात नगरपरिषदेच्या सत्तेत वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






