पातूर प्रतिनिधी :
पातूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. अशातच पातूर शहरातील ज्येष्ठ नागरिक श्री. विष्णू खुरसडे यांनी शिवसेना उभाठा पक्षात प्रवेश केल्याने शहरातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. माननीय आमदार नितीन बाप्पू देशमुख व देवलाल भाऊ डाखोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे असे सूत्राकडून कळते.
खुरसडे यांच्या प्रवेशामुळे गुजरी लाईन, खडकेश्वर परिसरातील शिवसेना गटाला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क व सामाजिक कार्याचा प्रभाव लक्षात घेता आगामी निवडणुकीत या प्रवेशाचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पातूर शहरात आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख निरंजन बंड तसेच काही माजी नगरपरिषद पदाधिकारी निवडणुकीची रणनीती आखत असून बूथनिहाय तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना उभाठा गटाने निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, विरोधकांकडून शिवसेनेवर “खान सेना” अशी टीका करण्यात येत असताना विष्णू खुरसडे यांसारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवेशामुळे विरोधकांना मोठी चपराक बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना उभाठा गट व काँग्रेस यांची युती झाल्यास शहरातील किमान आठ जागांवर शिवसेनाचा विजय निश्चित असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र विरोधकांकडून उभाठा गटाला केवळ चार जागांपुरते मर्यादित ठेवण्याची टीका करण्यात येत असून आगामी निवडणुकीत नेमके चित्र काय उभे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






