पातूर प्रतिनिधी…
पातुर तालुक्यातील गावंडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नरेंद्र मेराम चव्हाण (वय ४९ वर्षे) यांनी सततची नापिकी, शेतीतील वाढता खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावंडगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चव्हाण यांच्या नावे चिचखेड (पिंपळखुटा) शिवारात सुमारे तीन एकर शेती असून या शेतीवरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शेतीच्या उत्पन्नातून भागविला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी,अनियमित पाऊस,निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे पीक नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतीतून खर्चही निघणे कठीण झाले होते.त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट अधिकच गडद होत गेले.शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळणे,वाढता कर्जाचा बोजा आणि सातत्याने होणारे आर्थिक नुकसान यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.अखेर या परिस्थितीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.नरेंद्र चव्हाण हे मनमिळाऊ,प्रेमळ व सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गावात परिचित होते.त्यांच्या निधनामुळे गावंडगावसह परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







