पातुर प्रतिनिधी : पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नानासाहेब नगरातील विविध प्रलंबित समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नानासाहेब नगर परिसरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही,तसेच अनेक ठिकाणी नाल्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.याशिवाय परिसरातील पथदिवे बंद असून रात्रीच्या वेळी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.परिसरातील इतरही मूलभूत सुविधांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.या समस्यांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला यापूर्वी वारंवार सूचना व निवेदने देण्यात आली होती.मात्र,मागण्यांची अपेक्षित दखल न घेतल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान ग्रामसेवक यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत लेखी स्वरूपात काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात जिल्हाप्रमुख रेखाताई राऊत,तालुकाप्रमुख सपना नवले,उपशहरप्रमुख माधुरी शेगोकार,संतोष लसनकार,शहरप्रमुख राहुल भगत,मंगेश चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नानासाहेब नगरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने मार्गी लावाव्यात आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.







